राज्यातील शाळा, अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रांसह ‘जिओ टॅगिंग’ करणार   

पुणे : प्राथमिक शिक्षणाची संस्कार केंद्र असणार्‍या अंगणवाड्या, शाळा यांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रांसह ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार आता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रांसह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी महास्कूल जीआयएस मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे.
 
या अ‍ॅपमध्ये शाळांना त्यांचा यूडायस कोड किंवा यूडायस प्लसमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करायचे आहे. त्यानंतर शाळेची यूडायस प्लसमध्ये भरलेली माहिती या अ‍ॅपमध्ये दिसणार आहे. त्यानंतर शाळेचे जीआयएस लोकेशन घेऊन शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण पाच छायाचित्र समाविष्ट करून संबंधित शाळेने माहिती भरायची आहे. ही माहिती भरताना संबंधित मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो, माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घ्यावी. संबंधित माहिती अ‍ॅपवर दि. ३० एप्रिलपूर्वी अद्ययावत करावी. सर्व शाळांकडून ही माहिती भरून घेण्यात येत असल्याची खातरजमा संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
 
राज्यातील सर्व शाळांबाबतची विस्तृत माहिती केंद्र शासनाच्या यूडायस प्लस या पोर्टलवर उपलब्ध असून, यामध्ये शाळांबाबतची विविध माहिती जसे विद्यार्थीसंख्या, शिक्षकसंख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा आदी माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून, या माहितीचा वापर शासनस्तरावर विविध धोरण, कार्यक्रमांची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना होत असतो. धोरणांच्या आखणीकरिता व अंमलबजावणीकरिता अन्य माहिती जसे गाव, वाडी, वस्ती यांचे ठिकाण, लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा, राज्यमार्ग, महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, दोन शाळांमधील अंतर, शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयी-सुविधा यांबाबतची माहिती विभागाकडे सद्यःस्थितीत उपलब्ध नव्हती. ही कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर अर्थात एमआरएससी या संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. त्यामुळे एमआरएससीकडे उपलब्ध विविध विभागांची माहिती व यूडायस प्लस या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागाची माहिती यांचे एकत्रिकरण करून संबंधित माहिती एका स्वतंत्र डॅश बोर्डवर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.
 

Related Articles